मालवण ता.११-:* केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मालवण पंचायत समितीला जाहीर झाल्यानंतर मालवणचे माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे तर सन २०२०-२१ या वर्षामध्ये मालवण पंचायत समितीने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने आणि या योजना राबविण्यासाठी प्रशासनाला सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ त्यामुळेच पंचायत समितीच्या यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या शिरपेचात या पुरस्काराने आणखी एक तुरा खोवल्याची प्रतिक्रिया मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.
मालवण पंचायत समितीला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे यावर आपली प्रतिक्रिया देताना मालवण पंचायत समितीचे माजी सभापती अजिंक्य पाताडे व माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच जनतेच्या हिताचे कामकाज यामुळे मालवण पंचायत समितीने देशपातळीवर आपला झेंडा फडकवला असून या यशाचे श्रेय सर्वांना असल्याची भावना व्यक्त केली आहे.देश पातळीवरील सन्मान मिळवणारी जिल्ह्यातील मालवण ही पहिली पंचायत समिती ठरली आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मालवण पंचायत समितीला २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
पंचायत समितीच्या यशाचे श्रेय हे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, जनता ,पदाधिकारी, कर्मचारी, तसेच सहकारी गटनेते सुनील घाडीगावंकर, सर्व सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचेही आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा भक्कम पाठिंबा आणि माजी खासदार निलेश राणे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्य यामुळे हे यश साधणे शक्य झाल्याचेही पाताडे व परुळेकर यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने प्रतिक्रिया देताना गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी मालवण पंचायत समितीने सन २०२०-२१ मध्ये जी विकासाची व प्रशासकीय कामगिरी केली त्याचे मूल्यमापन जिल्हास्तरीय निवड समितीने केले होते.
मालवण पंचायत समितीने जे उत्कृष्ट काम केले त्या कामामुळेच पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार मिळाला. पंचायत समिती स्तरावर या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्यामुळे हा पुरस्कार मिळाला. यापूर्वी मालवण पंचायत समितीला यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्काराने सन्मानित केले आहे आता पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराने मालवण पंचायत समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापुढे यशवंत पंचायत राज पुरस्कारासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे अशी माहितीही जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.
