कणकवली ता.११-:* सर्व जातींच्या प्रतिनिधींची बैठक येथील भवानी सभागृह कणकवली येथे नुकतीच पार पडली. यावेळी सुमारे १० जातींच्या संघटनांचे पदाधिकारी व वधू-वर मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये सभेचे आयोजक चंद्रशेखर उपरकर, एस. टी. सावंत, विलास गुडेकर, नंदकुमार आरोलकर, महेश काणेकर, सखाराम सपकाळ, वैभवी सावंत, दिलीप हिंदळेकर, सतीश पोयेकर, सदाशिव गुरव, सत्यविजय जाधव, बापू महाडिक, सुशील सावंत, नितीन तळेकर इत्यादी प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वधू-वरांच्या अनेक समस्यांबाबत आणि लग्न जुळविताना येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
काही वधू-वर सूचक मंडळाकड़ून होणारी आर्थिक फसवणूक, पालकांना होणारा मानसिक त्रास, मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा वगैरे विषयांवर अनेकांनी बैठकीत चिंता व्यक्त केली. चर्चेअंती “सर्व जाती वधू-वर सूचक समन्वय समिती “स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीतर्फे येत्या १ मे २०२२ रोजी कणकवली येथे बसस्टँड समोरील “सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल येथे सर्व जातींच्या प्रथम वर-वधू, घटस्फोटित, विधुर, विधवा, अपंग अशा सर्वांसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत नोंदणी व प्रत्यक्ष पसंती मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच केवळ पालकांनी उपस्थित न रहाता वधू अथवा वरासोबत एकाच पालकांना उपस्थित रहाता येईल.
नोंदणी फी फक्त २००/-रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील समन्वय समितिची पुढील बैठक शनिवार दिनांक २३ एप्रिल २०३२ रोजी सकाळी १० वाजता भवानी सभागृह तेली आळी, कणकवली येथे होणार आहे. त्यासाठी संपर्क श्री चंद्रशेखर उपरकर, ९०२२६२१७२३ या क्रमांकावर करावा.असे आवाहन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस मराठा, गाबीत, वैश्य वाणी, कोष्टी, तेली, सुतार, गुरव, शिंपी, चर्मकार, कुंभार समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. अजूनही ज्या जातीच्या प्रतिनिधींना येता आले नाही त्यांनी सहभागी व्हायचे असेल त्यांनीही सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
