मालवण ता.१०-:* गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे रामनवमी उत्सव साजरा करता आलेला नसताना आज दोन वर्षांनी रामनवमी उत्सव मालवण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव शिवकालीन परंपरेनुसार मोठ्या थाटात संपन्न झाला. ढोल ताशांच्या गजरात आणि रामनामाच्या जयघोषात किल्ले सिंधुदुर्ग गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील विविध मंदिरातही रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सिंधुदुर्ग किल्ल्यामधील शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक थाटात रामनवमी साजरी करण्यात आली. या सोहळ्यास भाविक भक्ताची उपस्थिती लाभली होती.
सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले. यात सकाळी ११ वा. राम जन्मावर आधारित सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.१२.३० वाजता मंदिराच्या गाभाऱ्यात साकारलेल्या पाळण्यात श्री रामप्रभूच्या मूर्तीला घालण्यात आले. अन श्री रामाच्या जयघोषाने फुले व गुलालाची उधळण झाली. राम जन्मोत्सव झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात राम नामाचा जयघोष करत शिवराजेश्वर मंदिराभोवती पालखी प्रदिक्षणा घालण्यात आली.
या उत्सवात मिरवणुकीत किल्ले रहिवासी व मुंबईस्थित चाकरमानी, भाविक व पर्यटक सहभागी झाले होते. या पालखी मिरवणूक सोहळ्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. मालवण देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथील रामेश्वर मंदिर, तारकर्ली येथील महापुरुष मंदिर, गवंडीवाडा येथील राम मंदिर याठिकाणी राम जन्मोत्सव साजरा होऊन यावेळी बहुसंख्य भाविकांनी गर्दी केली होती. तसेच मेढा येथील राममंदिर, एसटीस्टँड नजीक राम मंदिर, भरड येथील दत्त मंदिर आदींसह विविध ठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मसुरे येथे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम’ अशा नामघोषात मसुरे देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात हजारो भविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सव काळात सकाळी श्रीची विधिवत पूजा, श्री सुधाकर जोशी यांनी पुराण वाचन केले. श्री रामजन्म कथा कीर्तन सादर केले. मध्यान्ह दुपारी १२:३० वा. रामजन्म सोहळा भक्ति भावनेने पार पडला. यानंतर मंदिराच्या भोवताली श्रीची पालखी प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उपस्थित भविकांना मंडळाकडून महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला गावचे मानकारी, ग्रामस्थ व दशक्रोशीतिल हजारो भाविक उपस्थित होते.
