मालवण शहर महिला भाजपाच्यावतीने आयोजन
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने महिलांसाठी आयोजित मच्छिवर आधारित सी फूड पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध पाककृती सादर केल्या. बांगडा, पेडवे म्हाकुल, खेकडा, कोलंबी यांचा समावेश असलेल्या विविध मसालेदार, चमचमीत आणि नाविन्यपूर्ण पाककृती लक्षवेधी ठरल्या. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह येथे महिलांसाठी सी फूड पाककला स्पर्धा व फनी गेम्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मालवण शहर अध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी भाजपच्या महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा करलकर, महानंदा खानोलकर, पूजा वेरलकर, अब हडकर, प्रमोद करलकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, दुर्गेश गावकर यांच्यासह आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सौ. अन्वेषा आचरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अन्वेषा आचरेकर यांनी प्रास्ताविक करत मालवणी मुलुखाची खास माशांचे मालवणी जेवण ही ओळख आहे.
त्यामुळे माशांपासून विविध पाककृती बनविण्याची महिलांना संधी व त्या सादर करण्याचे व्यासपीठ मिळावे म्हणून ही खास मच्छीवर आधारित पाककला स्पर्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली असल्याचे सांगितले. तर परीक्षक म्हणून लाभलेले माता वैष्णोदेवी हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य समीर तारी यांनी महिलांनी विविध पाककृती बनविताना भविष्यात याच पाककलेतून उद्योजकतेकडे वाटचाल करावी असे सांगितले.
या पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी मच्छिवर आधारित बनविलेले पदार्थ स्वतः घरातून बनवून आणत आकर्षक पद्धतीने मांडणी केली होती. यामध्ये कोलंबी मसाला, बांगड्याचे तिखले, मालवणी संगम वडा, पेडव्याची चटणी, कोलंबी चटणी, फिश टिक्का, कोलंबी चिली, म्हाकुल क्रिस्पी, प्रॉन्स मंच्युरियन, प्रॉन्स बिर्याणी, शिवड चिली, खेकडा भाजी, पेडवे चटणी, कोलंबी तवा मसाला , बांगड्याचे कटलेट, कोलंबी पनीर चिली, सुका खेकडा फ्राय अशा विविध पाककृती सादर करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण माता वैष्णोदेवी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्या समीर तारी, प्राध्यापक प्रथमेश ठाकूर, प्राध्यापक सूरज शेटकर यांनी केले. त्यांना मेघा सावंत, संजय गावडे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.
