उपोषण स्थगित : तिलारी अभियंत्यानी दिले लेखी आश्वासन
सावंतवाडी ता 9 : तिलारी कालव्यातील पाणी गेली अनेक महिने आश्वासनांवर आश्वासने देऊन देखील रोणापालपर्यंत न पोचल्याने आज रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी येथील तिलारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर तिलारी पाटबंधारे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले या उपोषणाला सरपंच संघटनेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला.
या उपोषणाला सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद गावडे, वासुदेव जोशी (सरपंच नाणोस) , दिनानाथ कशाळीकर (सरपंच सातोळी) बावळाट , समीर गावडे (सरपंच, निगुडे) विजय वालावलकर उपसरपंच, मडुरा, गुरुदास गवंडे उपसरपंच, निगुडे, भिकाजी केणी उपसरपंच रोणापाल, विलास सावंत (अध्यक्ष सिंधुदुर्ग फळ बागायतदार), उदय देऊलकर (माजी सरपंच रोणापाल) जगन्नाथ पंडित, प्रकाश वालावलकर ग्रामपंचायत सदस्य मडुरा , अरुण पंडित, नितीन मावळणकर, सुदीन गावडे आदीं उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. तीस वर्षापूर्वी तिलारी धरणाचे काम सुरू झाले असून अद्याप पर्यंत रोणापाल गावाला पाणी आलेले नाही या प्रकल्पासाठी कवडीमोल दराने शेतकऱ्यांनी पाण्याच्या आशेने जमिनी देखील दिल्या मात्र योग्य सहकार्य हे शेतकऱ्यांना होताना दिसत नाही तर या कालव्याची कामे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आहेत की ठेकेदारांची पोट भरण्यासाठी यावर प्रश्नचिन्हच आहे असे गावडे यांनी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विलवडे, ओटवणे, इन्सुली, मडुरा, निगुडे, रोणापाल, सातोसे, पाडलोस आदी सरपंच, उपसरपंच यांना तिलारी पाटबंधारे विभागाने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी आपल्या स्वाक्षरीने १५ मार्च पर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे असे लेखी पत्र दिले होते मात्र पाणी न आल्याने १५ मार्च नंतर कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतल्यानंतर ३० मार्च ला पाणी सोडणार असे सांगण्यात आले परंतु ३० मार्चला पुन्हा भेट घेतल्यानंतर ०८ एप्रिल पर्यंत नक्कीच पाणी सोडू असे आश्वासन कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दिले परंतु आश्वासनावर आश्वासन देऊन देखील पाणी न सोडल्याने रोणापाल गावचे सरपंच सुरेश गंगाराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पासून पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी तिलारी पाटबंधारे कार्यालया सामोरे आमरण उपोषण सुरू केले होते जोपर्यंत तिलारी पाटबंधारे पाण्याचा निर्णय मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती या उपोषणास सरपंच संघटनेने मोठया पाठिंबा दर्शविला अखेर तिलारी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी उपोषण स्थळी येत उपोषण कर्त्यांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली यावेळी 10 मे पर्यंत तिलारी कालव्यात पाणी 42 किमी पर्यंत पाणी सोडू असे लेखी आश्वासन त्यांनी दिले या लेखी आश्वासनानंतर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले
