तुळस व होडावडातील ‘त्या’ शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन
वेंगुर्ला ता.०३-:* दोन लाखांवरील थकित कर्जातून शेतक-यांना मुक्त करावे याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना तुळस व होडावडा येथील शेतक-यांनी दिले. अन्यथा १ मे रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित केली असून या योजनेतून दोन लाखांवरील कर्जदारांचा प्रश्न सोडवू असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप ही कर्जमाफी झाली नाही. खावटी कर्ज माफ होईल या आशेवर शेतकरी होते ते कर्जही माफ झाले नाही.
पुनर्रचित हवामानावर फळपीक विमा अंतर्गत २०२०-२०२१ एचडीएफसी अॅग्रे जनरल इन्शुरन्स कंपनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांना दोनवेळा लेखी सूचना देऊनही तुळस व होडावडा गावातील सरासरी दीडशे शेतकरी विमा तफावतीपासून वंचित आहेत. सदर विमा तफावतीची रक्कम तात्काळ जमा करावी. ३० एप्रिलपर्यंत वरील मागण्या मान्य झाल्यास १ मे या महाराष्ट्र दिनी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी आंबा काजू बागायतदार विचार मंचचे सदस्य श्यामसुंदर राय, प्रदिप सावंत, यशवंत भगत, सुभाष सावंत, जयवंत सावंत, मेघःशाम भगत, सुभाष भगत आदी उपस्थित होते.
