राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालवण शहराध्यक्ष पदी सतीश आचरेकर यांची निवड

मालवण ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालवण शहर अध्यक्ष पदी मालवणातील पर्यटन व्यावसायिक आणि युवा कार्यकर्ते सतीश आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी अमित सामंत यांच्या हस्ते सतीश आचरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मालवण येथील हॉटेल चिवला येथे मालवण तालुका राष्ट्रवादी क्राँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीस ज्येष्ठ नेते काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, माजी शहरअध्यक्ष अगोस्तीन डीसोजा, माजी उपसभापती नाथ मालोंडकर, आगोस्तीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, सुधीर धुरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सदानंद मालंडकर, अशोक पराडकर, सलीम खान, बाबी वायंगणकर, विनोद जाधव, अभी घाडीगावकर, प्रकाश भोसले, नामदेव गिरकर, हरिश्चंद्र परब, तुळशीदास चव्हाण, अॅड. सदफ खटखटे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अमित सामंत म्हणाले, सतीश आचरेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सहा महिने झाले. मात्र त्यांनी कधीही कोणत्याही पदाची मागणी केली नाही. मालवण शहराची जबाबदारी आचरेकर यांच्याकडे द्यावी अशी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यास माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनीही हिरवा कंदील दिला. आचरेकर यांचा जनसंपर्क व लढाऊ वृत्ती पाहूनच त्यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. सतीश आचरेकर यांच्यासारखे नेतृत्व मालवण शहरात राष्ट्रवादी संघटना वाढवण्यास निश्चितच मोलाची भूमिका बजावेल. आगामी मालवण नगरपालिका निवडणुक देखील सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल. आचरेकर यांना अनेकदा सरकारी यंत्रणांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र आता आचरेकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. वरिष्ठ नेतेमंडळी व मंत्री यांचे पूर्ण पाठबळ सतीश आचरेकर यांना लाभेल असेही अमित सामंत म्हणाले. या निवडी नंतर बोलताना सतीश आचरेकर म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाने शहराध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडणार आहोत. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल ती देखील आपण पार पाडून निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा उभा करू. स्वबळावर लढण्याची जरी वेळ आली तरी पूर्ण ताकदीने लढण्याची क्षमता असून त्यादृष्टीनेही तयारी करू, शहरात राष्ट्रवादी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी आचरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page