शहरातील दुकानफोडीचे सत्र सुरूच…

बस स्थानक परिसरातील तीन दुकाने फोडली; रोख रक्कमेसह मुद्देमाल चोरीस

देवगड ता.२९-:* देवगड शहरातील दुकान फोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने देवगड बसस्थानकासमोरील ३ दुकानांचे कुलूप हत्याराने तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दोन सीसीटीव्ही फोडून नुकसान केले. व या घटनेत सुमारे १२ हजार ४५०/- एवढ्या रोख रकमेचा मुद्देमाल लंपास केला.या घटनेसंदर्भात मोहम्मद शोएब चेरूवलापिलली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवगड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोरील न्यू रॉयल बेकरी हे दुकान अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून तसेच दोन सीसीटीव्ही तोडून टाकून दुकानात प्रवेश केला व या दुकानातील रोख रक्कम रु ९२००/-एवढा मुद्देमाल लंपास केला. त्याच नजीक असलेल्या अलंकार कॉस्मेटिक या दुकानाचे कुलूप तोडून रुपये ३०००/- एवढी व नजीकच्या स्वामी समर्थ जनरल स्टोर्स या दुकानाचे कुलूप तोडून त्या दुकानातील रुपये २५०/- मुद्देमाल लंपास केला. या घटनेचा तपास करण्याकरता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्याच बरोबर ठसे तज्ञ देवगड शहरात दाखल झाले होते. परंतु अद्याप पर्यंत अज्ञात चोरट्याचा सुगावा लागलेला नाही ठराविक अंतराने श्वानाने धाव घेऊन अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश आले नाही.या पूर्वी देवगड शहरात तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली होती.त्यामुळे स्थानिक व्यापारी हैराण झाले असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवि कलम ३८०,४५४,४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव पोलीस नाईक अशिष कदम हे करीत आहे.

You cannot copy content of this page