शाळा बंद असताना छप्पर कोसळल्याने अनर्थ टळला
कणकवली ता.२९-:* खारेपाटण या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक हसोळटेंब कोंडवाडी शाळेच्या इमारतीचे छप्पर सोमवारी रात्री अचानक कोसळल्याने इमारतीसह शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.मोडकळीस आलेल्या या शाळेच्या इमारतीचे छप्पर शाळा बंद असताना पडले म्हणून बरे झाले.अन्यथा शाळा भरलेली असताना आणि मुले वर्गात शिकत असताना जर छप्पर अचानक पडले असते तर मोठा अपघात घडला असता.मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
शालेय इमारतीचे छप्पर पडले असल्याची माहिती मिळताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर,तलाठी के सिंगनाथ पोलीस पाटील दिगंबर भालेकर,केंद्र प्रमुख श्री. सद्गुरू कुबल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महेश राऊत,उपाध्यक्षा सौ. श्रावणी राऊत आदींनी शाळेला तातडीची भेट देऊन शालेय इमारत पडलेल्या भागाची पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खारेपाटण हसोळटेम्ब कोंडवाडी जि प शाळेचे मुख्यध्यापक प्रवीण कासार व शालेय शिक्षक मंगेश मुद्रस यांनी मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा सकाळी उघडली असता शाळेच्या मुख्य इमारतीचे छप्पर कोसळून कौले,रिफा, वासे तसेच इमारतीच्या आतील वस्तूंचे मोठया प्रमानात नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच स्थानिक प्राधिकरणाला व शिक्षण विभागाला याबाबत तातडीने माहिती दिली.
या बाबत नुकतेच एक पत्र गटशिक्षणाधिकारी कणकवली पंचायत समिती कणकवली यांना देण्यात आले असून शाळेची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी.अशी मागणी ग्रामस्थांच्या व पालकांच्या वतीने करण्यात आली आहे.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत दोन दोन स्वतंत्र अशा चार वर्ग खोल्यांची व डोंगर वस्तीवर असलेल्या या शालेय इमारतीच्या शाळेत २ शिक्षकांसह एकूण ७ मुले शिकत असून शाळेची इमारत दुरुस्तीला आली असून धोकादायक अवस्थेत असल्याने त्याची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी जि. प. शिक्षण विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून छपराचे वासे पूर्णताह बाद झाले आहेत. खिडक्या दरवाजे लाकूड सडलेल्या स्थितीत आहेत. शालेय इमारतीच्या नुकसाणीच्या घालण्यात आलेल्या पांचयादीत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रथमीक अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसानीचा अहवाल प्रशासनाला ताबोडतोब पाठवून देण्यात आला.
खारेपाटण हसोळटेम्ब कोंडवाडी जि. प. शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळून झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास व शाळा दुरुस्ती करीता अनुदान मंजूर न केल्यास शाळेत मुले न पाठविता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल.असा इशारा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी प्रशासनाला दिला आहे.
