नववर्षानिमित्त मालवण मध्ये भव्य स्वरूपात निघणार नववर्ष स्वागत यात्रा…

मालवण ता.२८-: मालवण शहरामध्ये गेली १९ वर्षे गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघत असून यावर्षी ही स्वागत यात्रा भव्य स्वरुपात करण्याचा संकल्प दत्त मंदिर भरड येथे झालेल्या नियोजन सभेत करण्यात आला. उद्योजक दीपक परब हे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

हिंदू नववर्ष स्वागतयात्रा गुढी पाडव्याला २ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. दत्त मंदिर- भरड -बाजारपेठ -मार्गे फोवकांडा पिंपळ मार्गे मामा वरेरकर नाट्यगृह असा स्वागतयात्रेचा मार्ग राहणार आहे.

स्वागतयात्रेमध्ये वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. पहिला गट बालवाडी ते दुसरी व दुसरा गट तिसरी ते सातवी असा राहिल. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन असे पाच क्रमांक काढले जाणार आहेत. नेरूर येथील प्रसिद्ध रोंबाट ढोल ताशा पथक, मर्दानी खेळांचे प्रदर्शन, घोडे आदी स्वागत यात्रेची प्रमुख आकर्षण राहणार आहेत. 

मालवण शहरवासियांनी आपल्या घरापुढे रांगोळ्या काढून व पुष्पवर्षावाने स्वागत यात्रेचे स्वागत करण्याचे तसेच पारंपरिक वेषात सहभागी होण्याचे आवाहन हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे करण्यात आले यावेळी सर्व ज्ञाती, मठ मंदिरे, मंडळे, आध्यात्मिक संस्था यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वागतयात्रा समितीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page