मालवण ता.२७-:* ओम कबड्डी प्रबोधिनी, मुंबई व जय गणेश क्रीडा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने मालवणात आयोजित कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा रविवारी समारोप झाला. भंडारी हायस्कुल पटांगण व बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा ६२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. भंडारी हायस्कुल येथे आयोजित समारोप कार्यक्रमात भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. माया मेहेर यांच्यासह सर्व प्रशिक्षकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कबड्डी प्रशिक्षणात दि. २१ मार्च पासून १६ वर्षाच्या आतील मुला – मुलींना कबड्डी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तारक राऊळ व सीताराम साळुंखे, एन.आय. एस. प्रशिक्षक जीवन पैलकर, राष्ट्रीय खेळाडू वैशाली सावंत या नामांकित खेळाडूंसह अजय पेंडूरकर, प्रमोद पेंडूरकर, लक्ष्मनारायण कामत, कृष्णा काताळे, नंदू बोबाटे, अनिल नागवेकर, राजेंद्र कवळे, शशिकांत राऊत, रमेश लांबे यांनी कबड्डी खेळाचे प्रशिक्षण दिले. तर पुणेरी फलटण संघाचे फिटनेस ट्रेनर संग्राम मांजरेकर, मुंबई एफसी संघाचे फुटबॉल व हॉकी कोच शृंगार राऊळ, परवेझ, पवन यांनी शारीरिक तंदुरुस्ती बाबत प्रशिक्षण दिले. यासाठी मालवण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रुजरिओ पिंटो, नितीन हडकर, हरिश्चंद्र साळुंखे, मंदार ओरसकर, रेनॉल्ड बुतेलो या स्थानिक कबड्डी प्रशिक्षकांचे देखील सहकार्य लाभले. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष आनंद बांबर्डेकर, डॉ. प्रसाद धुमक यांनी उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी सर्व प्रशिक्षकांचा भंडारी हायस्कुलतर्फे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षक आर.डी. बनसोडे आदी उपस्थित होते.
