मालवणात होणार विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धा

मालवण ता.२६-:* महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने येथे १४ व १५ मे रोजी विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर व सचिव हेमंत वालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण चिवला बीच येथील हॉटेल गुरूज् किचन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी असोसिएशनचे खजिनदार नितीन तळेकर, सहसचिव दिपक जाधव, चंद्रकांत रेवंडकर, अनिल आचरेकर, अरूण भोगले आदी उपस्थित होते. यावेळी विष्णू कोरगावकर म्हणाले, टेबल टेनिस हा खेळ विद्यार्थ्याच्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी आवश्यक आहे.

त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांना टेबल टेनिस खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१-७२ च्या बॅचने भंडारी हायस्कूलच्या इमारत दुरूस्तीसाठी मदतनिधी उभारण्यासाठी सहकार्य केले. टेबल टेनिसचा प्रसार व्हावा यासाठी ही बॅच प्रयत्नशील आहे. यासाठी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन व १९७१- ७२ च्या बॅचने विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मालवणात होणार आहे. या स्पर्धेसाठी रोख बक्षिसे व चषक असे बक्षीसांचे स्वरूप असणार आहे. श्री. वालकर म्हणाले, टेबल टेनिसची स्पर्धा विभागीय स्तरावर असणार आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेपूर्वी सहभागी स्पर्धकांसाठी तसेच नवोदित टेबल टेनिसपटूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षक ममता प्रभू या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

You cannot copy content of this page