एकात्मिक बालविकास सेवा योजने तर्फे आयोजन
वेंगुर्ले ता.२६-:* एकात्मिक बालविकास सेवा योजना वेंगुर्लाच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ या कार्यक्रमा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. उमा घारगे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी वेंगुर्ले च्या नायब तहसीलदार वेंगुर्ला सौ. सुवर्णा केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. वेंगुर्ले येथील या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती गोसावी, शिक्षण विभागाचे श्री तातू नवार, विस्तार अधिकारी श्री जयेश राऊळ, पर्यवेक्षिका श्रीमती माधुरी मेस्त्री, गीता परब, कनिष्ठ सहाय्यक विजया तुळसकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सत्कारप्राप्त लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात ॲड. सौ. श्रद्धा बाविस्कर यांनी महिलांचे अधिकार याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले.
तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एक व दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या तालुक्यातील १४ दाम्पत्यांचा तसेच मुलगी दत्तक घेतलेल्या सौ. संजना व संदीप तुकाराम कुबल शिरोडा खालचीकेर या दाम्पत्यांचा आणि कला क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील १४ मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान ताणतणाव या विषयावर चिन्मयी नाईक यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा सामंत यांनी तर श्रीमती वेदिका नवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
