कणकवली ता.२६-:* खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून गावातील महिलांसाठी कागदी व कापडी पिशव्या बनविणे तसेच फॅन्सी पर्स बनविणे इत्यादींचा समावेश असलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा.प सदस्य महेंद्र गुरव,सौ उज्वला चिके,अंजली कुबल,सोनल लोकरे, आरती कर्ले, विठ्ठलाई बहुउद्देशीय सेवाभावी स संस्थेचे प्रमुख सचिन पाटील व सौ. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या मोफत कौशल्य विकास शिबिराचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. तर सर्व उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थी महिलांचे खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच या महिलांच्या दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाला भुदरगड, जि.कोल्हापूर येथील विठ्ठलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बसरेवाडी या संस्थेच्या प्रशिक्षित प्रशिक्षकांनी येथील सुमारे ५० पेक्षा अधिक महिलांना कागदी व कापडी पिशव्या बनविणे व फॅन्सी पर्स बनविणे आदीचे प्रशिक्षण दिले.
महिलांनी अशा छोट्या छोट्या घरगुती व्यवसयातुनच आपल्या कुटुंबा बरोबरच आपला स्वतःचा विकास साधावा.आणि महिला यातून आर्थिक सक्षम बनून स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात हा एकमेव उद्देश डोळयांसमोर ठेऊन महिलाकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर यांनी केले.
