आम. नितेश राणे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी
कणकवली 25 मार्च (प्रतिनिधी)- ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे देवगड हापूस सह काजू व अन्य फळ पिके संकटात सापडली असून बागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसानभरपाई द्या अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाने केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,गेली काही वर्षे बदललेल्या ऋतूचक्रामुळे प्रचंड प्रमाणावर कोकणातील आंबा, काजू व अन्य फळ बागायतदार आर्थिक संकटात सापडलेला आहे. यावर्षी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर झालेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे मागील सहा महिन्यांपासून विशेष करुन आंबा बागायतदारांनी पदरमोड करुन लाखो रुपये खर्ची घालून किटकनाशक खते यांचा वापर करुन पोटच्या मुलाप्रमाणे निगा राखून आंबा बागा, काजू बागा व अन्य फळफळावळाच्या बागा उभ्या केलेल्या आहेत. मात्र ऐन फळ काढणीच्या वेळी निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे मोठया प्रमाणात आंबा, काजू तसेच अन्य फळावर यांच्यावर बुरशीजन्य प्रादूर्भाव झाल्याने बागायतदारांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.
यामुळे या बागायतदारांना त्वरीत सावरणे अत्यंत गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर कॅनिग आंब्याची खरेदीही कवडीमोल भावाने होत आहे. यामुळे कॅनिंग आंब्याच्या खरेदीला राज्य शासनाने हमी भाव देणे गरजेचे आहे. देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतक-यांनी त्यांच्या आंब्याच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात एक सविस्तर निवेदन तहसिलदार, देवगड यांना सादर केलेले आहे. सदरहू निवेदनाद्वारे आंबा बागायतदारांना एक लाख हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी. आंबा कॅनिंग खरेदीला हमी भाव द्यावा व अन्य काही मागण्या केलेल्या आहेत. सबब आपण या प्रकरणी गांभीर्याने विचार करुन आंबा व काजू, अन्य फळावळ बागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई कॅनिग आंब्याला हमी भाव तसेच अन्य मागण्यांबाबत विना विलंब ठोस निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी केली आहे
