कोरोना महामारीनंतर तरी विद्यार्थ्यांना शिकू द्या

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली ता.२४-:* कोरोना महामारीनंतर आता कुठे शाळा नियमितपणे सुरू झाल्या असून शिष्यवृत्ती, नवोदय, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या तत्सम स्पर्धा परीक्षा लगतच्या काळात होऊ घातलेल्या असताना शिक्षक, अंगणवाडीताई, पालकांना प्रशिक्षणासाठी जुंपले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे. त्यामुळे प्रशिक्षणांच्या सिलसिल्यांबाबत पूनर्रविचार व्हावा अशी मागणी बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने नुतन शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले. प्रथम संघटनेच्या वतीने महेश धोत्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपण करणार असलेल्या सर्व उपक्रमांच्या सोबत महासंघ कायम असेल असे संघटनेच्या वतीने आश्वासन देण्यात आले.

यावेळी निवेदनातील समस्यांवर शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी मोकळेपणाने चर्चा करून आपल्या स्तरावरील समस्यांवर निर्णायात्मक कार्यपद्धती जाहीर केली. यामध्ये संघटनेच्या मागणीप्रमाणे शालेय पोषण आहाराचे धान्य दोन दिवसांत शाळांना वितरीत होणार आहे. वरीष्ठ वेतन श्रेणीबाबत यापुढे नवीन कार्यप्रणाली कार्यरत केली जाणार असून त्रुटीविरहीत कार्यपद्धतीमध्ये दोन टप्प्यात सर्वांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर झालेल्या शाळांच्या सुगम, दुर्गम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या त्रुटींवर काम सुरू असून सुधारित यादी काही दिवसांत प्रसिद्ध होईल.

तर बदली प्रक्रियेबाबत योग्य ते मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याचे काम सुरू असल्याबाबत सांगितले. वारंवार प्रलंबित असणाऱ्या आणि दिरंगाईने होणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत यापुढे आपण सुनियोजित पध्दतीने सिस्टीम तयार करत असुन यापुढे पगार नियमितपणे आणि १ तारीखला प्राप्त होणार असल्याची ग्वाही दिली. तर शाळांच्या विजबिलांबाबतच्या प्रश्नावर निधी प्राप्त असुन हा प्रश्न यापुढे सुटलेला आहे असे सांगितले.

याप्रमाणे पात्र आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे, रिक्त उपशिक्षक, पदवीधर, केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पदे लवकरत लवकर भरण्यात यावीत अशा संघटनेच्या मागण्या वरीष्ठ स्तरावर कळवल्या जातील असे महेश धोत्रे यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर, जिल्हासचिव लक्ष्मण घोटकर, उपाध्यक्ष कुंडलिक माने, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोहर सावंत, राजीव बिरादार, सचिन कांबळे उपस्थित होते. यावेळी स्वागत लक्ष्मण घोटकर तर आभार विनायक हरकुळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page