दोडामार्ग ता.१९-:* वझरे गावात गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली शिमगोत्सव मधिल गाडा उत्सव ( दोरी बांधून रथ ओढणे) ही परंपरा आजही जोपासली जात आहे.शेकडो वर्षांपूर्वी वझरे गावातील गवस कुटुंब ग्रामस्थ यांच्यावर मेशांनी जबरदस्त जुलमी अन्याय अत्याचार केला याचा बिमोड करण्यासाठी गमिनी काव्यानी लढा देऊन मेशांचा नायनाट करुन विजय प्राप्त केला या विजयाचे प्रतीक म्हणून वझरे गावात गाडा उत्सव साजरा केला जातो.शनिवारी दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखदार पार पडला.
दोडामार्ग पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वझरे एकमेव गावात ही गाडा ओढणे (रथ ओढणे) प्रथा आहे.होळी पौर्णिमा झाली कि तिसऱ्या दिवशी हा गाडा उत्सव साजरा केला जातो.दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांतील नागरीक वझरे पंचक्रोशीतील मानकरी तसेच गोवा राज्यातील तसेच वझरे गावातील ग्रामस्थ यांचे नातेवाईक हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून दाखल होतात त्यामुळे सातेरी देवी मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
