प्रस्तावाची ७४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम मंजूर;मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी दिली माहिती
*💫मालवण दि.०९-:* गतवर्षी क्यार व महाचक्रीवादळामुळे राज्यातील सागरी मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे मत्स्य पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेज पहिला टप्पा म्हणून राज्य मत्स्य विभागाला ३२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडे पहिल्या टप्प्यात साडेचार कोटी निधी जमा झाला आहे. जिल्ह्यात पॅकेज वाटपाच्या तिसऱ्या टप्प्यात गुरुवारी ३४५ नौकाधारकांचे ७४ लाख ८० हजार रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले, अशी माहिती मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी दिली. मत्स्य पॅकेज वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा मत्स्य विभागाने सर्वप्रथम २८६ मासेमारी नौकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या २८६ लाभधारकांसाठी सुमारे ७० लाख रुपये प्राप्त निधीतून खर्ची घालण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९४ मासेमारी नौकांसाठी १९ लाख ३० हजार रुपयांचे प्रस्ताव कोषागार विभागाकडे पाठविण्यात आले. ९ सप्टेंबर २०२० च्या शासन परिपत्रकानुसारच हे तिन्ही टप्प्यातील पॅकेज वाटप करण्यात आले आहे. मत्स्य पॅकेज लाभार्थीबाबत ९ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने जारी केलेले निकष अत्यंत जाचक असल्याने अनेक रापण व्यावसायिक, खलाशी वर्ग आणि नौकामालक या लाभापासून वंचित राहणार असल्याची बाब मच्छीमार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर काही दिवसापूर्वीच निकष बदलाबाबत पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आता सुधारित शासन निर्णयाकडे या सर्वांचे तसेच मस्त्यविक्रेत्या महिलांचे लक्ष लागून आहे. कारण मासे विक्रेत्या महिलांनी मत्स्यपेट्या ऐवजी रोख रक्कम देण्याची मागणी केलेली आहे. मच्छीमार महिलांचे साडेतीन हजार अर्ज मत्स्य कार्यालयात ३ हजार ६१५ मच्छीमार महिलांचे मत्स्य विक्रेत्या म्हणून अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जाची रितसर छाननी करून योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी सांगितले. महाचक्रीवादळामुळे ज्या मच्छीमारांच्या नौका, जाळी आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले, अशांना मालवण तहसील कार्यालयाकडून १३ लाख ४० हजार रुपये वितरित करण्यात आले. यामध्ये १८ नौकाधारकांना ७३ हजार ८०० रुपये तर ४६० मच्छीमारांना ४८७ जाळ्यांच्या नुकसान भरपाई पोटी १२ लाख ६६ हजार २०० रुपये निधी बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आला आहे.
