आंबा-काजू नुकसानीचा तातडीने पंचनामा करा

तुळस येथील बागायतदानांची मागणी

वेंगुर्ला ता.१६-:* गेले चार ते पाच दिवस बदलत असलेले हवामान, धुळीचे वादळ तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा अशी मागणी तुळस येथील आंबा-काजू तसेच भातपिक शेतक-यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात सतत तीन ते चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि आता जानेवारी ते मार्च या दरम्यान बदलत्या हवामानामुळे तसेच पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. एकूण पिकापैकी फक्त १० टक्के पिक शेतक-यांच्या हाती उरले असल्याने शेक-यांमध्ये चितेचे वातावरण पसरले आहे. आंबा व काजू पिकासाठी शेतकरी बँकेतून कर्जे काढली आहेत. सन २०१५ ते २०१९ या काळातील २ लाखांवरील कर्जे अजूनही थकित आहेत. या रक्कमेवरील व्याज वाढत असून ही रक्कम भरण्यासाठी थकित कर्जदारांना नोटीसा बजावल्या जात आहेत. हे कर्ज माफ होईल या आशेवर शेतकरी जगत होते. परंतु, अधिवेशनात याबाबत निर्णय झाला नसल्याने शेतक-यांचा आशेचा किरण मावळला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी आमची मागणी आहे.

जुलै २०२१ मध्ये शेतक-यांनी भातपीक विमा, इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरलेली असून कंपनी जवळ भातपिकाचे नुकसान झाल्याची तक्रार नोंदणी करुन ७ ते ८ महिने होऊन सुद्धा विमा कंपनीने अद्यापपर्यंत शेतक-यांना विमा रक्कम जमा केलेली नाही. तुळस व होडावडा गावातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी यांनी पुनर्रचित हवामानावर २०२०-२१मध्ये विमा भरलेला असतानाही एसडीएफसी इन्शुरन्स कंपनीने शेतक-यांवर अन्याय केला असून मिळणारी रक्कम मातोंड सर्कलप्रमाणे न मिळता ती वेंगुर्ला सर्कलप्रमाणे दिली गेली. शासनाने व विमा कंपनीने लवकरात ती रक्कम मातोंड सर्कलप्रमाणे शेतक-यांच्या खात्यात जमा करावी. दरम्यान, सध्या झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा असे या निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर २८ आंबा, काजू बागायतदार व भातशेती शेतक-यांच्या स्वाक्ष-या असून हे निवेदन तुळस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शामसुंदर राय यांच्यासह प्रदिप सावंत, बाबा तेली, जयवंत सावंत व विठ्ठल आरोसकर यांनी सादर केले. नायब महसूल तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी हे निवेदन स्विकारले.

You cannot copy content of this page