पार्सेकर दशावतार मंडळाचे तिस-या पिढीचे वारसदार गौरव पार्सेकर यांचा वांद्रेश्वर मंडळातर्फे सत्कार

वेंगुर्ला ता.१७-:* वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पार्सेकर दशावतार कंपनीच्या तिस-या पिढीचे वारसदार गौरव प्रभाकर पार्सेकर यांचा श्री देव वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव १६ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

यावेळी श्रीसत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘पृथ्वी शापित पार्वती‘ हा विशेष नाट्यप्रयोग सादर झाला. यावेळी बहुसंख्य नाट्यरसिक उपस्थित होते. या नाटकावेळी आपल्या पारंपारिक कलेचा वारसा जोपासणारे पार्सेकर दशावतार कंपनीचे तिस-या पिढीचे वारसदार गौरव पार्सेकर यांचा वांद्रेश्वर मंडळाच्यावतीने ज्येष्ठ दशावतारी कथा लेखक भाऊ भगत व वांद्रेश्वर मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित कनयाळकर, रामेश्वर दशावतार मंडळाचे संचालक भैय्या गुरव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वांद्रेश्वर देवस्थानचा हा वेंगुर्ला शहरातील जूना परंपरागत वार्षिक उत्सव असून फार पूर्वी तरंग देवतांनी या देवस्थानला भेट दिल्याचे जुन्या लोकांकडून ऐकावयास मिळते अशी माहिती दादा सोकटे यांनी प्रास्ताविकात दिली.

You cannot copy content of this page