रेवतळे येथे घराला आग;

आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला

मालवण ता.१४-:* मालवण शहरातील रेवतळे येथे डॉ. हरीश परूळेकर यांच्या दवाखान्यानजीक राहणाऱ्या ममता प्रकाश वायंगणकर यांच्या राहत्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यावेळी डॉ. परुळेकर पती- पत्नीसह स्थानिक नागरिकांनी धावाधाव करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. श्रीमती वायंगणकर यांची परिस्थिती हालाखीची असून त्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दीपक पाटकर यांनी आहे.

रेवतळे येथे डॉ. परुळेकर यांच्या हॉस्पिटल नजीक ममता प्रकाश वायंगणकर या आपल्या मुलासमवेत राहतात. त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. ही घटना निदर्शनास येतात डॉ. हरिश परुळेकर आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ धावाधाव करून ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीची माहिती नगरपालिकेला दिल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी हेमंत आचरेकर, रमेश कोकरे यांनी येथे येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आली. या आगीत वायंगणकर यांच्या पडवीचे तसेच माडाचे नुकसान झाले आहे. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी येथील रहिवासी श्री. राणे यांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर श्री. पाटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

यावेळी या नुकसानीचा उद्या तातडीने पंचनामा करून घेत श्रीमती वायंगणकर यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दीपक पाटकर यांनी दिली आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे मालवण शहरातील अग्निशमन वाहनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवण नगरपालिकेचे अग्निशमन वाहन जीर्ण झाल्याने निर्लेखीत करण्यात आले आहे. मात्र नगरपालिकेला अद्याप नवीन अग्निशमन गाडी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शहरात आग लागल्यावर अनेकवेळा अग्निशमन गाडीची कमतरता जाणवून येते. आजही आग लागल्यावर अग्निशमन गाडीची उणीव भासून आली.

You cannot copy content of this page