जिल्हा परिषदेच्या शौषखड्डा मोहिमेला मोठा प्रतिसाद

१३ हजार ७५४ मारले शौषखड्डे; दोन कोटी ३७ लाखांचे अनुदान वितरण

सिंधुदुर्गनगरी ता १४ सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोषखड्डे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या वर्षी जिल्ह्यात १३ हजार ७५४ कुटुंबानी शोष खड्डे पाडले आहेत. त्यापैकी ९ हजार ५०० कुटुंबाना प्रति कुटुंब २ हजार ५०० रूपये प्रमाणे २ कोटी ३७ लाख ५० हजार एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी आज जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिली.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, समिती सदस्य सरोज परब, श्वेता कोरगावकर, आदींसह खातेप्रमुख ,अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या शोषखड्डे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबाकडे शोष खड्डा असावा. यासाठी जिल्ह्यात केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यातील २४ हजार कुटुंबानी शोषखड्डा साठी प्रस्ताव केले. तर १३ हजार ७५४ कुटुंबांनी शोषखड्डा पूर्ण केला आहे. त्यापैकी ९ हजार ५०० कुटुंबांना प्रत्येक कुटुंब २ हजार ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत २ कोटी ३७ लाख ५० हजार एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले आहे.

तसेच उर्वरित कुटुंबांनाही लवकरच अनुदान वितरित केले जाईल. अशी माहिती जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी सभेत दिली. जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर ४४.६० टक्के, लघु उपसा जलसिंचन पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. सन २०२१-२२ मध्ये १ लाख ४८ हजार ७५० एवढया पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६६ हजार ३४५ रुपये एवढी पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये देवगड ५२.४३ टक्के, वैभववाडी ८७.७९ टक्के, कणकवली १५.१९ टक्के, मालवण १९.७८ टक्के, कुडाळ ३८.९० टक्के, वेंगुर्ला ५६.३१ टक्के, सावंतवाडी ४९.५३ टक्के, तर दोडामार्ग तालुक्याची ७०.७४ टक्के पाणीपट्टी वसुली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी उदयकुमार महाजन यांनी सभेत दिली. जिल्ह्यात ११० पाणी नमुने दूषित सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये तपासण्यात आलेल्या एकूण १४२७ पाणी नमुन्यांपैकी ११० पाणी नमुने (७.७१ टक्के) दूषित आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक दूषित पाणी नमुने सावंतवाडी तालुक्यात १९.०७ टक्के एवढे आढळले आहेत.

तर दोडामार्ग ९.४३ टक्के, वेंगुर्ला ८.५७ टक्के, कुडाळ ७.५१ टक्के, मालवण ३.५९ टक्के, कणकवली ४.०२ टक्के, देवगड २.६७ टक्के, तर वैभववाडी तालुक्यात ६.०२ टक्के, एवढे दूषित पाणी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी सभेत दिली.

You cannot copy content of this page