*⚡वेंगुर्ला ता.१४-:* आगामी होणा-या नगरपरिषद, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून त्यासाठी संघटना बांधणीसाठी वाडीवार गटप्रमुख नेमण्यात येणार आहेत. या गटप्रमुखांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री यांचे सहाय्यक पवार हे एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिर घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ला येथे दिली.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी वेंगुर्ला तालुका शिवसेनेची बैठक संपन्न झाली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, ओबीसी सेलचे निलेश चमणकर यांच्यासह सचिन वालावलकर, शैलेश परुळेकर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते.
या बैठकीत मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाटी वाडीवाडीवार गटप्रमुख नेमण्याच्या सुचना तालुकाप्रमुखांना करण्यात आल्या आहेत. हे गटप्रमुख शासकीय योजनाची माहिती तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत. त्यांना ट्रेनिग देण्यासाटी मुख्यमंत्री याचे सहाय्यक पवार हे एप्रिल महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. एप्रिलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही शिबिरे घेण्यात येणार आहेत.
शरद पवार यांनी देशासाठी व देशातील शेतक-यासाठी दिलेल्या योगदानाचा विचार न करता आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांची तुलना दाऊदबरोबर केल्याने मासिक सभेत त्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित १५ मार्च रोजी वेंगुर्ला उप जिल्हा रुणालय येथे महा आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
