एस एस पी एम हॉस्पिटलमधील दोन कर्मचाऱ्यांचा प्रताप;दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी
ओरोस ता १४ पडवे येथील एस एस पी एम हॉस्पिटल येथील मेडिकलमधील दोन कर्मचाऱ्यांनी तेथील व्यवस्थापनाची तब्बल साडे पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पडवे येथील एस एस पी एम हॉस्पिटलमधील फार्मसी मध्ये तुषार लवू सावंत (वय ३३), रा आवळेगाव व संदीप हरी आंगणे (वय ३७) रा. अणाव हे हेल्पर म्हणून कामाला होते. या दोघांनी २०१८ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत हॉस्पिटल मधील रुग्णांनी न घेतलेली औषधे परत दिल्याची बिले तयार केली. अनेक रुग्णाची अनेकवेळा अशी बिले तयार करून त्यांच्या असलेल्या हॉस्पिटलच्या रक्कमेतील ५ लाख ५० हजार रुपये स्वतःसाठी वापरून हॉस्पिटल प्रशासनाची फसवणूक केली.
याबाबत हॉस्पिटल डिन डॉ राघवेंद्र कुलकर्णी यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ११ मार्च २०२२ रोजी याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भादवी कलम ४०८, ४२० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
