लोकशाहीच्या चार पैकी दोनच आधारस्तंभावर विश्वास-एम.के.गावडे

वेंगुर्ला ता.१४-:* पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी पत्रकार व न्यायालय या दोनच आधारस्तंभावर आज लोकांचा विश्वास राहिला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारीतेची धार बोथट होवू देवू नये असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी केले.

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा, मान्यवरांचे सत्कार व बक्षिस वितरण असा तिहेरी कार्यक्रम वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या अध्यक्षतेखाली व कल्याण डोंबिवली मनपाचे उपायुक्त रामदास कोकरे, (ऑनलाईन), जिल्हा दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष एम.के.गावडे, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत, जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, चार्टर्ड इंजिनियर विवेक कुबल, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीने जाहिर केलेले कै. शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त भरत सातोस्कर (तरुण भारत), कै. अरुण काणेकर स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त मॅक्सी कार्डोज (पुढारी), कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त विनायक वारंग (सामना) व कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय महिला पुरस्कार प्राप्त साप्ताहिक किरातच्या संपादिका सिमा मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, समानपत्र, समानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. तसेच यावेळी वेंगुर्ला न.प.चे माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचाही मानपत्र, समानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून ऑनलाईन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कुडाळ पत्रकार समितीचा व्याधकार ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारप्राप्त के.जी.गावडे (तरुण भारत), जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त महादेव उर्फ आपा परब (तरुण भारत) व नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेचा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार दिपेश परब (सकाळ) यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तर वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते श्रद्धा पाटकर (कणकवली), पार्थ परब (देवगड) व संगिता नाईक (सावंतवाडी) यांना सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मुकनायक‘ हे वृतपत्र सुरु केले होते. आताही पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी मुकनायक बनावे असे प्रतिपादन अनुश्री कांबळी यांनी केले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी आज पत्रकारीतेमध्ये फार मोठे करीअर नसले, पत्रकारांना आज फार मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी येत असल्या तरी जिल्ह्यातील पत्रकारांनी सचोटी कायम राखली असल्याचे सांगितले.

वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यामुळेच आपण वेंगुर्ल्यात चांगले काम करु शकलो. तसेच तेथील लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, सामाजिक संस्था यांनीही चांगली साथ दिली. माझ्यानंतर आलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवले. त्यामुळेच २० ते २५ पुरस्कार व २२ करोड रुपयांचा निधी वेंगुर्ला नगरपरिषदेला मिळू शकला. वेंगुर्ला ही स्वच्छतेची जननी बनली असल्याचे रामदास कोकरे यांनी सांगितले.

यावेळी जयपकाश चमणकर, विधाता सावंत, यशवंत परब, रमण वायंगणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास आमदार दिपक केसरकर यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. सिमा मराठे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रदिप सावंत यांनी प्रास्ताविक, महेंद्र मातोंडकर यांनी सुत्रसंचालन, तर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष के.जी. गावडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page