परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दुकानांबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल…

मालवण दि प्रतिनिधी दिवसेंदिवस मालवण शहरात वाढत चाललेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दुकानांबाबत जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने जोरदार विरोध केल्यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवरून स्थानिक व्यावसायिकांमध्ये काल झालेल्या वादंगच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि मालवण व्यापारी संघ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत मालवण व्यापारी संघाने येत्या दोन दिवसात त्या दुकानाचे काय करायचे याबाबत मालवण व्यापारी संघ निर्णय घेईल, असे सांगितल्याने त्या परप्रांतीय दुकानाबाबत निर्णय दोन दिवस पुढे ढकलला गेला आहे.

एकीकडे मत्स्य उत्पादनात झालेली घट आणि कोरोना काळात ठप्प झालेला पर्यटन उद्योग या कारणामुळे मालवणातील स्थानिक बाजारपेठेला आर्थिक झालं पोहचली असताना अलीकडच्या काळात मालवणात परप्रांतीयांची दुकाने थाटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने या गोष्टीला जोरदार विरोध दर्शविला आहे. काही महिन्यांपूर्वी मालवण शहरात एका नेपाळ्याने स्वतःचे चायनीज सेंटर सुरू केल्याने पर्यटन व्यावसायिक महासंघाने त्यांना आक्षेप घेतला होता.

त्यानंतर त्या नेपाळी व्यापाऱ्याने दुकान थाटण्याचा आपला मनसुबा रद्द केला. आता पुन्हा एकदा मालवणात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केल्याचे समजताच पर्यटन व्यावसायिक महासंघाने त्याला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचे ठरविले. यासाठी मालवण व्यापारी संघाबरोबर बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले होते. काल याच विषयावरून पर्यटन व्यावसायीक महासंघाचे पदाधिकारी व स्थानिक गाळे मालक यांच्यात बाचाबाची झाली होती. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मालवण सोमवार पेठ येथील हनुमान मंदिरात मालवण व्यापारी संघ व पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मालवण व्यापारी संघाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, पदाधिकारी विजय केनवडेकर, तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाब मोंडकर, अविनाश सामंत, मंगेश जावकर, शेखर गाड, मेघा सावंत, वीणा वनकुद्रे, भाग्यश्री धारगळकर, मीना घुर्ये, दीपा वनकुद्रे, चारुशीला आचरेकर, कैसर पठाण, सत्यम पाटील, श्री. धारगळकर, श्री. वनकुद्रे आदी व इतर उपस्थित होते. यावेळी मालवण शहरात परप्रांतीयांच्या वाढत्या दुकानांबाबत चिंता व्यक्त करताना आपापसात भांडणे करता परप्रांतीयांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवला पाहिजे, असे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी येत्या दोन दिवसात त्या परप्रांतीय व्यक्तीच्या दुकानाबाबत व्यापारी संघ निर्णय घेईल असे सांगितले. मालवण व्यापारी संघाच्या भूमिकेवर पर्यटन व्यावसायिक महासंघाने सहमती दर्शवली.

You cannot copy content of this page