महिलांनी पुढे येऊन स्वतःला सिद्ध करावे…

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांचे प्रतिपादन....

दोडामार्ग : समाजातील प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, आपले नाव समाजात निर्माण केले पाहिजे, आज प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहे, त्यामुळे आपल्यासाठी प्रत्येक क्षेत्र खुले आहे, म्हणूनच पुढे या आणि स्वतःला सिद्ध करा,असे प्रतिपादन दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दोडामार्ग येथील महिलांना केले.

पिंपळपान महिला बचत गट व चेतन चव्हाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराच्या उदघाटन कार्यक्रमात ते ऐवळे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. च्या शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिक्षिका संप्रवी भागवत, नगरसेविका गौरी पार्सेकर, क्रांती जाधव, संजना म्हावळणकर, ज्योती जाधव, स्वराली गवस, सुकन्या पनवेलकर यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.

डॉ. ऐवळे पुढे म्हणाले की, फक्त ‘महिला दिन’ हाच आपला एकमेव आनंद आणि उत्सवाचा दिवस असता नये तर प्रत्येक दिवस महिलांचाच असतो असे समजून आपण आनंदी राहा. खरं तर महिलाच खरी कुटुंबाची केअर टेकर असते, पण ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे.

यासाठी वेळीच्या आवश्यक त्या तपासण्या करा असे आवाहन डॉ. ऐवळे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुक्मिणी शिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केलं. तर आभार क्रांती जाधव यांनी मानले. या आरोग्य शिबिरात महिलांचा रक्तगट व त्यांच्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात आले. शिबिराला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, अक्षरशः रांगा लावून आपल्या आरोग्य विषयक तपासण्या करून घेतल्या. डॉ. अनिशा दळवी, देविदास गवस, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिक्षिका संप्रवी भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले.

You cannot copy content of this page