Headlines

कवीची प्रगल्भता जेवढी अधिक, तेवढे त्याचे काव्य सकस – विजय जोशी

मालवण ता.०८-:* जीवन जाणीवेच्या तळापर्यंत जावून सत्याचा जी कविता शोध घेते तीच खरी कविता असते. कवीची प्रगल्भता जेवढी अधिक असते तेवढे त्याचे काव्य सकस असते, म्हणून कवीने सामाजिक बांधिलकी जपत समाज अभिरुची लक्षात घेऊन समाजाला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार व समीक्षक श्री. विजय जोशी यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त कवी विजय जोशी यांचा “संवाद कवितेशी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते, मालवणी कवी रुजारियो पिंटो, सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला देऊलकर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक विजय जोशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कवीवर्य कुसुमाग्रजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यानी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व कवी विजय जोशी यांचा परिचय करून दिला. कवी विजय जोशी यांनी अक्षर छंदातील कविता, मुक्त छंदातील कविता आणि अष्टाक्षरी कविता कशास म्हणतात याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली व काव्यलेखन करीत असताना कोणत्या गोष्टीचे ज्ञान नवकवीकडे असणे गरजेचे आहे, याविषयी चर्चा केली.

“संवाद कवितेशी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या स्वरचित ‘आयुष्याचे गीत गाऊया, निसर्ग गुरू, बायको, कवीच्या भावना, मनासारखी देखणी, घटाशाळेची, नात समातर रेषांच, सुखी संसाराचा मंत्र या कवितांचे सादरीकरण केले. त्याच बरोबर लाल मातीचं कोकण, ‘माझा त्वांड दिसता’ या मालवणी बोलीतील कवीतेचे सादरीकरण करून उपास्थिताना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद “संवाद कवितेशी” या त्यांच्या कार्यक्रमास मिळाला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत, सौ. मेघना जोशी मालवणी कवी रूजारियो पिटो, प्रथमेश सामंत, प्रा. एच. एम. चौगले यानीही आपल्या कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. कैलास राबते यांनी केले तर आभार प्रा. एच. एम. चौगले यानी मानले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी, मराठी विषयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग या उपस्थित होता.

You cannot copy content of this page