Headlines

महाजीविका अभियानाचा शुभारंभ

महिला दिनाचे औचित्य साधून उमेदचा उपक्रम

सिंधुदुर्गनगरी ता ८ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाजीविका अभियान राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.

याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक राजेंद्र पराडकर यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना म्हणाले, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी शासनाच्या विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. जागतिक महिला दिन ८ मार्च ते स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाजीविका अभिमान राबविण्यात येणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ मंत्रीमहोदयांच्या हस्ते राज्यस्तरावर आज संपन्न झाला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृती गावडे या गारमेंट उद्योजक महिलेला सन्मानित करण्यात आले. याचे ऑनलाईन प्रक्षेपण जिल्हा स्तरावर करण्यात आले.

सन २०२२-२३ हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे होणार आहे. या वर्षात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या जागतिक महिला दिन ८ मार्च ते १६ मार्च या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाजीविका सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध संस्था, बचतगट यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विविध प्रशिक्षणे, विविध विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

तसेच महिला व महिला बचतगटाच्या उपजीविकेसाठी उद्योग निर्मितीवर भर देतानाच, बचतगटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे आदींबाबत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालक राजेंद्र पराडकर यांनी दिली.

You cannot copy content of this page