कामाचे बिल देण्यास टाळाटाळ

ठेकेदार प्रसाद परब यांचे उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता ०८ स्ट्रीट लाईट (पथदीवे) बसविण्याच्या केलेल्या कामाची रक्कम वारंवार मागणी करूनही ती देण्यास कास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कामाची रक्कम तात्काळ मिळावी. या मागणीसाठी शासकीय ठेकेदार प्रसाद कृष्णा परब यांनी जिल्हा परिषदेसमोर आज लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील कास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सन २०१८ मध्ये मंजूर झालेले स्ट्रीट लाईट (पथदिवे )बसविण्याच्या काम केलेले असतानाही संबंधित कास ग्रामपंचायतीकडून केलेल्या कामाचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. याबाबत शासकीय ठेकेदार प्रसाद परब यांनी वारंवार ग्रामपंचायतीचे तसेच गटविकास अधिकारी सावंतवाडी यांचे लक्ष वेधले. तरीही केलेल्या कामाचे बिल अदा करण्यात आलेले नाही. याबाबत केलेल्या तक्रारीनुसार गटविकास अधिकारी सावंतवाडी यांनी बोलविलेल्या सुनावणीसाठी संबंधित कास ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मला नाहक आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागला.

संबंधित ग्रामसेवक व सरपंच सुनावणीस उपस्थित राहत नसल्याने माझ्या कामाच्या बिलाची रक्कम मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. तरी या बाबत सखोल चौकशी करावी व न्याय द्यावा. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय ठेकेदार प्रसाद कृष्णा परब यांनी जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन त्यांचेही लक्ष वेधले आहेत.

You cannot copy content of this page