ॲड.स्वाती तेली : वरवडे ग्रामपंचायत येथे महिला मेळावा
कणकवली ता.०८-:* समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या विचार आता इतिहासजमा झाला आहे. तरीही महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग झाले पाहिजे असे आवाहन ॲड.स्वाती तेली यांनी केले.
तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा झाला. यात ॲड. स्वाती तेली यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या राधिका सावंत, वरवडे सरपंच प्रभाकर बांदल, उपसरपंच प्रमोद गावडे, ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घाडीगावकर, सारिका लाड, स्वप्नाली सावंत, दीपाली सावंत, अजीजा खोत, डॉ.रूपाली वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. तेली म्हणाल्या, महिला आता समाजातील प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत आहे. त्यांच्या प्रगतीला समाजानेही सलाम केला आहे. समाजातील इतर महिलांनीही जीवनात यशाची नवे शिखरे गाठावीत. तसेच प्रत्येक महिलांनी आपले हक्क आणि अधिकाराबाबत जागरूक असायला हवे. गोरगरीब आणि अशिक्षित महिलांनाही त्यांचे हक्क मिळवून द्यायला हवेत.
तरच सर्व घटकांतील महिला सक्षम होतील महिला मेळाव्यात वरवडे गावातील महिलांनी विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. तर कोरोना काळात मोलाची कामगिरी बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी अादींचा सत्कार पंचायत समिती सदस्या राधिका सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धांत नैपुण्य मिळविलेल्या गुणवंतांचाही सत्कार या कार्यक्रमात झाला. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली वळंजू यांनीही महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तसेच गावातील सिद्धी वरवडेकर आणि करुणा घाडीगावकर यांनीही आपले विचार मांडले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरवडे गावच्या माजी सरपंच अंजली आरोसकर, किशोरी परब, आणि विनोदीनी मेस्त्री यांचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पावसकर यांनी केले.
