मालवण ता.०८-:* राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सिंधुदुर्ग मालवण तालुका महिला काँग्रेसच्या वतीने महिला सक्षमीकरण व कायदे विषयक ज्ञान अवगत करून देण्यासाठी कट्टा येथे महिलांचा एकत्रिकरण कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम देखील काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सौ. साक्षी वंजारी यांनी महिलांसाठी रोजगाराच्या सुविधा कश्या निर्माण होऊ शकतात यावर मार्गदर्शन केले. बचतगट सक्षम करून या गटातील महिलां आपल्या घराप्रमाणे व्यवसाय देखील नीट सांभाळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर यांनी महिलांवर होणारे अत्याचार, तरुण मुलींच्या बाबतीत मातांनी काय काळजी घ्यावी, एखादा प्रसंग उद्भवला तर त्यावर धैर्याने कसा सामना करावा व त्यावर मिळणारा न्याय तसेच महिलांना मोफत विधी सेवा कशी मिळवावी याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला तालुका उपाध्यक्षा सौ. ऋतुजा हेमंत माळकर व सौ. नीलम बांदेकर यांनी केले.
यावेळी मालवण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा ममता तळगावकर, कुडाळ तालुका महिला अध्यक्षा सुंदरवल्ली कनूस्वामी पडियाची व सावंतवाडी तालुकाध्यक्षा स्मिता वागळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मालवण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर तालुका उपाध्यक्ष हेमंत माळकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी योगेश्वर कुर्ले, सुनीता नांदोसकर, नांदोसच्या तंटामुक्ती अध्यक्षा संजना गावडे, मालती शिंदे, आशा नांदोसकर, पुष्पलता गावडे, शुभदा पाडगावकर, अमिता कदम, साक्षी खोत, जयंती गावडे, रुपाली शिंदे, शुभांगी मोरजकर, विजया शिंदे, शुभांगी शिंदे, वैशाली माने, लक्ष्मी नांदोसकर, मिताली नागवेकर आदि तसेच कट्टा परिसरातील महिला उपस्थित होत्या.
