सावंतवाडीतील एक जण ताब्यात; १० लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
बांदा ता.०७-:* गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कोल्हापूर भरारी पथकाने आज बांद्यात कारवाई केली. या कारवाईत गोल्डन आईस ब्ल्यू फाईन व्हिस्कीचे एकूण ७८ बॉक्स (९५६ बाटल्या) जप्त करण्यात आल्या. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ असा एकूण १० लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
याप्रकरणी नासीर इक्बाल राजगुरु (४३, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर भरारी पथक आज बांदा येथे तपासणीसाठी तळ ठोकून होते. गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्कॉर्पिओची (एमएच ०४ डीआर ५५९६) तपासणी केली असता गाडीत ७८ दारुचे बॉक्स आढळून आले.
याप्रकरणी नासीर राजगुरु याला अटक करण्यात आली. सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, आर. जी. येवलुजे, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.
