दुग्ध व्यवसायामुळे न्हावेलीचे अर्थकारण बदलणार

विद्या परब : सिंधू दुग्ध उत्पादक दूध संकलन केंद्राचे उद्घाटन

सावंतवाडी ता.०७-:* तळवडे गावात एकेकाळी आपण किटली घेऊन दूध संकलन केंद्रावर जायचो आणि आज आपल्या हस्ते न्हावेलीत दूध संकलन केंद्राचे उद्घाटन झाल्याने समाधान वाटते. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होत आहे. दुग्ध व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून शेळीपालनावरही तरुणांनी लक्ष द्यावा. स्वत:ची कष्ट करण्याची मानसिक तयारी ठेवून शेतीबरोबरच दूध व्यवसायात उतरले पाहिजेत.

कृपा सिंधू संस्थेमुळे न्हावेली गावाचे आर्थिक अर्थकारण बदलेल. या दूध संस्थेच्या माध्यमातून न्हावेली गावाचे नावलौकिक व्हावे. जिल्हा बँक संचालक या नात्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असे प्रतिपादन, जिल्हा बँक संचालक विद्या परब यांनी केले. श्री स्वामी समर्थ बचत गट संचलित कृपा सिंधू दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या.

न्हावेली दूध संकलन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी विद्या परब बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद देवधर, गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे डॉ. रेडकर, निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामपंचायत सदस्य भावना धाउसकर, न्हावेली उपसरपंच विशाल गावडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दादा परब, माजी सरपंच शशिकांत परब, दांडेली सरपंच दादा पालयेकर, तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रतिभा गावडे म्हणाल्या की, अधिक जनावरे घेऊन दुग्ध वाढवा. नोकरीकडे न धावता शासनाच्या योजना राबवत स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे त्या म्हणाल्या. निरवडे सरपंच हरी वारंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.प्रसाद देवधर म्हणाले की, गावातल्या मनुष्य गावात थांबला पाहिजे आणि कोरोनामुळे त्याचे कारण दिसून आले. वाटा, रस्ते अडविण्यात बसण्यापेक्षा दूध वाढीसाठीचा प्रयत्न करा. सिंधुदुर्गातील दुधाची क्वालिटी चांगली आहे. लोकप्रतिनिधींना विकासकामांत सोबतच तुमच्या गावचे तसेच मतदारसंघातील दूध किती वाढले, किती जनावरे आणली, गायीगुरांसाठी काय केले असे प्रश्न विचारले पाहिजे. केवळ सबसिडीच्या आशेवर न राहता पूर्णपणे व्यवसायात उतरल्यास शेतकऱ्याची आर्थिक प्रगती निश्चितच आहे, असे डॉ.देवधर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव वामन राऊळ यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष शरद धाऊसकर यांनी केले. आभार सचिव यांनी मानले.

You cannot copy content of this page