अमेय गावडे : विद्यार्थ्यांना मोफत पखवाज वादन शिकविणार
*⚡बांदा ता.०७-:* शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहेत. त्यात होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अर्धवट राहू नये, यासाठी पाडलोस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 मधील दोन विद्यार्थिनींचा चौथी पर्यंत येत्या शैक्षणिक वर्षांपासूनचा केवळ शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पखवाज वादक अमेय तुकाराम गावडे यांनी केला आहे. पाडलोस जिल्हा परिषद शाळेत आपल्या वाढदिवशी मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, मुख्याध्यापक उत्कर्षा परब, शिक्षक साहेबराव शेवाळे, पत्रकार विश्वनाथ नाईक आदी उपस्थित होते. श्री. गावडे म्हणाले की, गरिबीमुळे आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देताना अडचणी येतात. ग्रामीण भागातील पालकांची ही अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. गावातील तरुणांनी आपल्यापरीने अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करावा असे आवाहनही अमेय गावडे यांनी केले. तसेच भविष्यात आपण फावल्यावेळी विद्यार्थ्यांना पखवाज वादनाबरोबर अभ्यास करणे कसा सोपा होतो यासाठी मोफत प्रशिक्षण देणार असल्याची ग्वाही संगीत विशारद श्री. गावडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक उत्कर्षा परब यांनी तर आभार शिक्षक साहेबराव शेवाळे यांनी मानले.
