ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र व सुपारीचे झाड देऊन शेतकऱ्यांचा केला सन्मान
बांदा ता.०७-:* लागवडीसाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी नापीकतेकडे जात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा व जमिनीचे आरोग्य टिकवावे, असे आवाहन कार्यशाळेदरम्यान उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी केले.
कृषी तंत्र विद्यालय पाडलोस येथे 14 वा वित्त आयोगाअंतर्गत पाडलोस ग्रामपंचायतीने मातीपरीक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर अध्यक्ष कृष्णा करमळकर, सरपंच अक्षरा पाडलोसकर, उपसरपंच महादेव गावडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्रा. समीर कोलते, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्गाचे सचिव डी. आर. परब, सावंतवाडी पंचायत समिती कृषी विभाग विस्तार अधिकारी एकनाथ सावंत, बांदा मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाटगे, पोलीस पाटील रश्मी माधव, शिक्षक शैलेंद्र परब आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
बचतगट, गांडूळ खत, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, झाडू बनवणे, पशुसंवर्धन, सेंद्रिय शेती, जिवामृत, कुक्कुटपालन, भाजीपाला व्यवसाय, मूर्तिकार व प्रगतशील शेतकरी म्हणून ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र व सुपारीचे झाड देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 च्या विद्यार्थ्यांनी समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पाडलोस ग्रामपंचायतच्यावतीने 14 वा वित्त आयोगअंतर्गत आयोजित केलेल्या मातीपरीक्षण कार्यशाळेस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शविला. डी.आर.परब यांनी मार्गदर्शन करताना माती नमुने कसे घ्यावे, माती तपासणी का करावी, त्याचा उपयोग काय, घटकानुसार पीक पध्दती तसेच इतर माहिती दिली. जमिनीचे आरोग्य, उत्पादकता, मिश्र पिकांचे महत्त्व, बदलत्या हवामानानुसार पीकपद्धती या संदर्भात एकनाथ सावंत यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. तर प्रकाश घाटगे यांनी कृषी विभागाच्या योजना, पीकविमा, भाजीपाला, कीडरोग व्यवस्थापन, महाडीबीटी, मग्रारोहयो यासंदर्भात माहिती दिली. एकंदरीत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नोत्तर करून आपल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी पणशीकर यांनी केले. ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. आभार पत्रकार विश्वनाथ नाईक यांनी मानले.
