मालवण ता.०४-:* साळेल गावचे पोस्ट मास्तर भूषण गावकर यांनी साळेल गावचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गावकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता आले. त्यांनी मिळविलेले यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी केले.
नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाले. भारतीय संघाकडून साळेलचे पोस्ट मास्तर भूषण गावकर (रा. बाव, ता. कुडाळ) यांनी प्रतिनिधित्व केले. भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर साळेल ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या वतीने सन्मानचिन्ह देत सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच साक्षी जाधव, उपसरपंच रवींद्र साळकर, पोस्टमन अनिल गावडे, भटा परब, भूषण गावडे, अमित गावडे, गणेश गावडे, केशव जाधव, अभी जाधव, विकी पेडणेकर, सूर्यकांत गावडे, मयुरेश जाधव, राकेश जाधव, दर्शन गावडे, परेश गावडे, विजय गावडे, जयंत गावडे, कृष्णा गावडे, आकाश गावडे, मुरारी गावडे, समीर गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नेपाळ येथे फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आशियाई टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाने चार सामने खेळले. नेपाळ विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत भारत, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका या चार देशाच्या संघांनी सहभाग घेतला होता. गावकर यांनी यापुढेही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून साळेलचे नाव रोशन करावे, असे गावडे यांनी सांगितले. फोटो : भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात प्रतिनिधित्व केल्याबद्दल पोस्टमास्तर भूषण गावकर यांचा साळेल ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
