कणकवली ता.०४-:* कणकवली महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी राज्यभाषा दिनानिमित्त या वर्षी प्रथमच ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय व्हावा व त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनामध्ये उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, ग्रंथपाल विजय परब उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात कथासंग्रह कवितासंग्रह, चरित्र, कादंबरी, नाटके, विश्वकोश,शब्दकोश, सर्व महामानवांचे ऐतिहासिक ग्रंथ,संदर्भ पुस्तके, वैचारिक ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त देत पुस्तकांची माहिती जाणून घेतली.याप्रसंगी डॉ.राजेंद्र मुंबरकर, डॉ.सोमनाथ कदम,ग्रंथपाल विजय परब यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती दिली. या ग्रंथ प्रदर्शनासाठी ग्रंथपाल विजय परब,लिपिक अनिल राणे, ग्रंथालय कर्मचारी महानंद चव्हाण, महेश कोवळे, प्रशांत राणे, रत्नू गावडे यांनी या प्रदर्शनासाठी विशेष परिश्रम घेतले.
