भंडारी हायस्कुलच्या अंगणवाडी भिंती मुलांच्या प्रगल्भता वाढविणाऱ्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे गौरवोद्गार

मालवण दि प्रतिनिधी भंडारी प्राथमिक शाळेचा बालवाडी वर्ग शैक्षणिक दृष्ट्या अतिशय कल्पकतेने व नाविन्यपूर्ण पद्धतीने साकारला गेला आहे. वर्गाच्या भिंतीवर अभ्यासाच्या दृष्टीने रेखाटलेली चित्रे आकर्षक असून यामुळे लहान मुलांची वैचारिकता आणि प्रगल्भता वाढण्यास मदत होणारा असल्याने हा शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत आणि दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित भंडारी हायस्कुलला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भंडारी प्राथमिक प्रशालेच्या नूतनीकरण आणि आधुनिकिकरण केलेल्या बालवाडी वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ. कौमुदी पराडकर , भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉइन्ट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर गटशिक्षणाधिकारी माने, पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भगत, लोकल कमिटीचे सदस्य प्रकाश कुशे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, आदी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक विभागाचेमुख्याध्यापक मिलिंद भगत व शिक्षिका सौ. राधा दिघे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रशालेच्या वतीने अध्यक्ष विजय पाटकर यांच्याहस्ते राजेंद्र पराडकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तर शिक्षिका सौ. पी. एच. प्रभू यांच्या हस्ते कौमुदी पराडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र पराडकर व पाहुण्या मान्यवरांनी प्रशालेच्या बालवाडी वर्गाचे कौतुक केले. तर विजय पाटकर यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.

You cannot copy content of this page