*⚡मालवण ता.०३-:* कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्टव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन च्या वतीने मालवण येथील द फिटनेस वॉरियर जिमचा व्यायामपटू गणेश हनुमंत सातार्डेकर याने ५५- ६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश मिळविले आहे. त्याला रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील यवतमाळ, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यातील सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर ५५ – ६० किलो वजन गटात ३० स्पर्धक होते. सिंधुदुर्ग मधून एकमेव सहभागी असलेल्या मालवण मधील गणेश सातर्डेकर याने ५५- ६० किलो वजन गटात बाजी मारत विजेतेपद मिळविले. सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील शरीर सौष्ठव खेळाडूंना राज्य स्पर्धेचा अनुभव यावा म्हणून जिल्हा संघटनेच्या वतीने गो फॉर गोल्ड हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील टॉप बॉडी बिल्डर्सना घेऊन राज्य स्पर्धेत सहभागी करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात सुवर्ण पदक मिळवून गणेश सातार्डेकर याने केली आहे. त्याने नवीन बॉडी बिल्डर्सना प्रोत्साहित केले असून याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन गो फॉर गोल्ड उपक्रम, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्री.सुधीर हळदणकर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश सातार्डेकर, जिल्हा संघटना सदस्य उमेश कोदे, सचिव आंतर राष्ट्रीय खेळाडू किशोर सोनसुरकर यांनी गणेश याचे अभिनंदन केले आहे.
