बांधकामाच्या अंतिम सुधारित व मूळ अर्थसंकल्पास मान्यता

विषय समिती सभेत घेतला निर्णय

सिंधुदुर्गनगरी ता ०३ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सन २०२१-२२ चे ५ कोटी ८९ लाख ४३ हजार २०० रुपयांचे अंतिम सुधारित आणि सन २०२२-२३ चे ४ कोटी ९२ लाख १ हजार ७०० रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीस आजच्या बांधकाम समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता दत्ताराम सावंत, सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रिया सावंत, राजन मुळीक आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आर्थिक वर्ष अखेरची शेवटची सभा असल्याने निधी खर्चाच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. या सभेत बांधकाम विभागाचे चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ चे ५ कोटी ६९ लाख ४३ हजार २०० मूळ बजेट मध्ये २० लाखाची वाढ करत ५ कोटी ८९ लाख ४३ हजार २०० रुपयाचे अंतिम सुधारित बजेट (अर्थसंकल्प) मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या अंतिम सुधारित अर्थसंकल्पीय तरतुदीस मंजुरी देत सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली. तर सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी ९२ लाख १ हजार ७०० रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस बांधकाम समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा इमारतींची कामे ही अर्धवट स्थितीत आहेत. ती पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित करत सदस्य प्रदीप नारकर यांनी देवगड तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर असूनही ती पूर्ण न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करा, अशी सूचना केली. यावेळी पुरहानी आराखड्यातील कामे व डोंगरी विकास योजनेतील कामांबाबत माहिती देताना पुरहानीमधून जिल्ह्यात ९० कामे मंजूर असून ३५ कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. तर डोंगरी विकास योजनेतील १३८ कामे मंजूर असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

You cannot copy content of this page