आपली मातृभाषा आपणच जगवली पाहिजे…

कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष आनंद वैद यांचे प्रतिपादन…

मालवण दि प्रतिनिधी आज मराठी भाषेचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र ही गरज निर्माण होण्याला आपणच सारे जबाबदार आहोत. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक स्तरावर आपण मराठी बोलले पाहिजे, आपली मातृभाषा आपणच जगवली पाहिजे, असे प्रतिपादन कोमसापचे माजी जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि कुडाळ येथील साहित्यिक आनंद वैद्य यांनी मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुल येथे। बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक आनंद वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे लोकल कमिटीचे ट्रेझरर जॉन नरोना, पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षिका सौ संजना सारंग,सुनंदा वराडकर , ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक करत मराठी भाषेचे महत्व आणि भारतासह जगभरात मराठी भाषेचे असलेले स्थान याबाबत सविस्तर माहिती दिली.तर पर्यवेक्षक एच बी तिवले यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच सौ संजना सारंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी साहित्यिक आनंद वैद्य यांचा जॉन नरोना यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा व परिक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्य यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना आनंद वैद्य म्हणाले, आज महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची संख्या वाढली आहे. त्यांच्याशी बोलताना आपण हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र तसे न करता प्रत्येकाशी आपण आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीतून बोलले पाहिजे. इंग्रजी भाषेची भीती बाळगू नका. मराठी भाषेला इंग्रजी पासून नव्हे तर हिंदी भाषेपासून धोका आहे. आज मुंबईत दोन मराठी माणसे सुद्धा एकमेकांशी हिंदीत बोलताना दिसतात. आपण मराठी बोलणे टाळत असल्यामुळेच आज मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज निर्माण होऊन शासनाला मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे उपक्रम राबवावे लागत आहेत.

या स्थितीला आपणच सर्व जबाबदार आहोत. सर्व लोकांशी, सर्व ठिकाणी आणि सर्व स्तरावर आपण मराठी बोललो तरच आपली भाषा टिकणार आहे, असेही वैद्य म्हणाले. यावेळी जॉन नरोना यांनीही विचार मांडत ज्या भाषेतून आपल्याला प्रत्येक गोष्टीचे किंवा अभ्यासाचे उत्तम आकलन होते ती आपली मातृभाषा असते. आज इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना अभ्यासाचे योग्यप्रकारे आकलन होताना दिसत नाही. उच्च शिक्षण हे मराठी भाषेत उपलब्ध नसणे ही आपली मराठी भाषिकांची खंत आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनंदा वराडकर यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page