अन्यथा विज वितरण कार्यालयात माडणार ठाण; बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर यांचा इशारा
मालवण ता.२८-:* पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवण तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग व मालवण परिसरातील वीज ग्राहकांवर वीज वितरणचे अधिकारी वीजबिल वसुलीच्या नावाखाली अतिरेक व धाकटपटशा करत आहेत. याबाबतीत काही दिवसांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याने तर कहर केला. एकूणच त्या अधिकाऱ्याच्या वर्तणुकीबाबत पर्यटन व्यावसायिकात संतापाची लाट आहे.
शेकडोंच्या संख्येने लेखी पत्र त्या महिला अधिकाऱ्याविरोधात द्यायला व्यावसायीक तयारच आहेत. तरी त्या अधिकाऱ्याची बदली वीज वितरणने तात्काळ करावी. अन्यथा आम्ही वीज कार्यालयात ठाण मांडू अशी भूमिका तारकर्ली पर्यटन व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर व पर्यटन व्यवसायिकांनी वीज अधिकाऱ्यांसमोर मांडत मालवणच्या वीज कार्यालयात सोमवारी ठिय्या मांडला. दरम्यान, मालवण वीज कार्यालय उप कार्यकारी अभियंता साखरे यांनी याप्रश्नी जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधत पर्यटन व्यावसायिकांच्या निवेदनाचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी अभियंता कणकवली यांच्याकडे तात्काळ पाठविण्यात आल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले वायरी, तारकर्ली व देवबाग परिसरसतील वीज समस्या व वीज बिल आकारणी करण्यासाठी अतिरेक करणाऱ्या वीज अधिकाऱ्यांची बदली करावी या मागणीसाठी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पर्यटन व्यवसायिकांनी मालवण वीज कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता साखरे यांच्यासमोर पर्यटन व्यवसायिकांनी त्या महिला वीज अधिकाऱ्याच्या कारभाराचा पाढा वाचला.
यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, बाबा मोंडकर, पर्यटन महासंघ मालवण तालुकाध्यक्ष अवी सामंत, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर यासह मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, शाम झाड, राम चोपडेकर, केदार झाड, संदीप बोडवे, मनोज झाड, सिमाव फर्नांडिस, विकी लोकेगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, लक्ष्मीकांत तळवडेकर, संगीता बगळे, बबन तळवडेकर, अभय पाटकर, रुपेश सातार्डेकर, संदीप वस्त, राजेश चव्हाण, भानुदास केरकर, स्नेहा सरमळकर, गीता भोसले, संगीता हट्टीकर, राकेश कुंटे, बबली कांदळगावकर, मनोज हिंदळेकर, श्री. वाळवे, प्रतीक डीचोलकर, यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. वीज समस्या सोडवा वायरी तारकर्ली देवबाग याठिकाणी मोठ्या संख्येने व्यावसायिक वीज ग्राहक आहेत. येथील वीज समस्या प्राधान्याने सोडवणे गरजेचे असताना त्या सोडवल्या जात नाहीत. तोक्ते वादळात पडलेले वीज खांब वर्ष होत आले तरी अर्धवट कापून रस्त्यावर आहेत. खंडित होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा ही कायमचीच समस्या आहे. या भागासाठी असलेल्या महिला अधिकारी यांना रात्री निर्माण होणाऱ्या वीज समस्येबाबत संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वीज वितरणाच्या मोबाईल नंबरवर फोन करून आम्हाला वीज समस्या मांडता येत नसतील तर आम्ही काय करायचे ? आमच्यातील एका व्यवसायिकावर गुन्हाही नोंद झाला आहे.
आम्ही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही मात्र व्यावसायिकांवर संतप्त होण्याची वेळ का येते याचा वीज वितरणने विचार करावा. अशी भूमिका बाबा मोंडकर, अवि सामंत, सहदेव साळगावकर यांनी मांडली. यापूर्वी आम्ही वीज वितरण विभागाला सहकार्य केले आहे यापुढेही करू मात्र एका अधिकारी वर्गाच्या अतिरेक पणाचा त्रास सर्वाना होत आहे. आमच्यावर पण गुन्हे दाखल होण्याची भीती आम्हाला वाटते तरी यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी भूमिका व्यवसायिकांनी मांडली. दरम्यान याबाबत कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवण्यात आले. तसेच वायरी तारकर्ली देवबाग येथील वीज समस्या मार्गी लावण्याबाबत चार दिवसात कार्यवाही केली जाईल. मालवण वीज उपकेंद्रातून तारकर्ली-देवबाग भागात स्वतंत्र वीज पुरवठा देण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे साखरे यांनी सांगितले.
