मालवण (प्रतिनिधी) गाबीत जात नोंदीचा पुरेसा पुरावा नसल्याने गाबित समाजाला जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त झाले असून यामुळे शिक्षण, नोकरी, बढती सवलती मिळणे मुश्कील झाले आहे. याबाबत शासनाने तोडगा काढला याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघ या संस्थेतर्फे २८ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाबीत समाज नेते सखाराम मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना महासंघाच्यावतीने सादर करण्यात आले आहे. गाबीत समाजाच्या जात प्रमाणपत्र बाबत येणाऱ्या अडचणींबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने २० दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या निषेधार्थ सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. समाजाला येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात गाबीत बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विजय राऊळ, शंकर पोसम, सखाराम मालाडकर, श्री.सुरेश बापर्डेकर, शंकर पोसम, कु.प्रसाद बापर्डेकर, श्री. बबन कोयंडे श्री.हेमंत बांदेकर, श्री. दाजी जुवाटकर यांनी केले आहे.
