केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन
ओरोस ता.२५-: जिल्ह्यात उद्योजक आणण्यापेक्षा या जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोके तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथील नव उद्योजकांना संपर्क, संवाद व समनव्य परिषद कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री राणे यांनी तेथेच पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या विभागाचे सचिव बी बी स्वेन, खादी ग्रामीण उद्योग संस्था चेअरमन विनलकुमार सक्सेना व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, आमच्या ६० अधिकारी व यशस्वी उद्योजक यांनी उपस्थित राहत परिषदेला उपस्थित नव उद्योजकांना मार्गदर्शन केले. याला जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण होऊन येथे समृद्धी येण्यासाठी या परिषदेचा उपयोग होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी आमच्या सरकारने ११ करोड रोजगार निर्माण केले. ६ करोड उद्योजक बनविले.
या माध्यमातून सर्व राज्यांना समान संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात उद्योजक वाढले ते राज्याचे दरडोई उत्पन्न वाढेल. परिणामी देशाचे उत्पन्न वाढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले देशाचे दरडोई उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे सांगितले. २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र मंजूर यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्येक प्रकारच्या उद्योगांची माहिती दिली जाणार आहे. कोणत्या उद्योगाला खर्च किती ? कोणती मशीन लागणार ? ती वापरायची कशी ? ही माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील तरुण-तरुणींना उद्योजक बनवायचे आहे. त्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. यातून जिल्हा सुद्धा समृद्ध करायचा आहे, असे यावेळी मंत्री राणे म्हणाले.
