आंतरजिल्हा बदली व रिक्त जागा भरण्यासाठी कोकणभवनसमोर २८ रोजी धरणे आंदोलन

जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती;कोकणातील शिक्षक सहभागी होणार

कणकवली ता.२५-:* कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर जिल्हयांपैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या 14 ते 15 टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तात्काळ भरण्यात याव्यात आंतरजिल्हा बदली झालेल्या 2016 पासूनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 107 व रत्नागिरी जिल्हयातील 280 शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे , आंतरजिल्हा बदली टप्पा क्र. 5 मध्ये कोकण विभागाचा प्राधान्याने समावेश व्हावा, RTE कायद्याला छेद देणारे शासनाचे 9 जानेवारी 2019 चे पत्र रद्द करावे , पदवीधर शिक्षक , केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत या मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनसमोर 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हयातील शेकडो आंतरजिल्हाबदली बांधव व शिक्षक समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली .

यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जिल्हासरचिटणीस सचिन मदने , राज्यसहसचिव नामदेव जांभवडेकर , कोकणविभाग उपाध्यक्ष शरद नारकर , कार्याध्यक्ष नारायण नाईक , प्रवक्ता सुनिल चव्हाण कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव,श्रीकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते . सिंधुदुर्ग रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या कोकण विभागातील जिल्हयांमध्ये आंतरजिल्हा बदली संबधाने गेल्या 6 वर्षापासून विविध गंभीर प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने जिल्हास्तर ते राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा केलेला आहे . परंतु सिंधुदुर्गरत्नागिरी जिल्हयांमध्ये आंतरजिल्हा बदली मधील सुमारे 450 शिक्षक सन 2016 पासून कार्यमुक्तच्या प्रतिक्षेत आहेत . या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त आहे . त्यामुळे शासनाच्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्र 5 मध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांचा समावेश होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या जिल्हयांमधील कार्यरत आंतरजिल्हाबदली शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे .

याबाबत संघटनेची दि 16 फेब्रुवारी 2022 रोजी कोकण विभागातील 5 जिल्हयांच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची राज्याध्यक्ष यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली . या बैठकीत ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हाबदली बाबत कोकण विभागातील सिंधुदुर्ग्र रत्नागिरी जिल्हयांवर कमालीचा अन्याय झालेला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्यावतीने 28 फेब्रुवारी 2022 रोजी कोकण भवनसमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता याला बाधा न पोचवता कोव्हिड 19 संदर्भातील नियमांचे पालन करुन तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्याबाबत निर्णय घेण्यात आला .

या आंदोलनात कोकणविभागासह राज्यातील हजारो आंतरजिल्हा बदली शिक्षक सहभागी होणार आहेत . आंदोलनातील प्रमुख मागण्या – 1 ) कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या आंतर जिल्हा बदली पात्र शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे 2 ) RTE act 2009 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांवर हंगामी शिक्षणसेवक भरण्यास परवानगी देण्यात यावी . 3 ) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दि 9 जानेवारी 2019 चे RTE act 2009 ला छेद देणारे परिपत्रक रद्द करावे . 4 ) कोकणविभागातील जिल्हयांना 10 % ची अट रद्द अगर शिथील करावी . 5 ) आंतर जिल्हा बदली टप्पा .5 मध्ये कोकण विभागातील जिल्हयांचा समावेश करावा,या मागण्या असल्याचे नितीन कदम यांनी सांगितले.

You cannot copy content of this page