आमदार नितेश राणे यांचे ग्रामस्थांना आव्हान…
मालवण दि प्रतिनिधी आंगणेवाडी यात्रोत्सवात यात्रेकरू भाविकांना शुभेच्छा देताना आमदार नितेश राणे म्हणाले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आंगणेवाडीत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी विकास कामे प्रलंबित असून या कामांच्या पूर्ततेसाठी ना. राणे यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ? असा प्रश्न आज आंगणेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आज देवगड, कणकवली, वैभववाडी मतदार संघात विकासाची गंगा आली आहे. त्याच प्रमाणे या भागातही विकासाची गंगा आणण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना निवडून द्या, अशी साद त्यांनी घातली ते पुढे म्हणाले, राणे कुटुंबाला आजपर्यंत यश मिळाले ते भराडी देवीच्या आशीर्वादामुळे मिळाल्याची आमची भावना आहे. आज केंद्रीय मंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये ना नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली या भागातून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींनी निवडून आले तर या जिल्ह्याचा विकास कोणी थांबवू शकत नाही. आज कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातून आमदार म्हणून मी प्रतिनिधित्व करत आहे. भविष्यात कुडाळ मालवण मधून निलेश राणे यांच्या रुपाने हक्काचा आमदार दिलात तर तुमचे कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, असे नितेश राणे म्हणाले.
