आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवास लोटला भाविकांचा जनसागर…

मालवण ता.२४ प्रफुल्ल देसाई-: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी आज श्री देवी भराडीच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने भक्तीरसात न्हाऊन निघाली. श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भराडीचे दर्शन घेत नवस फेडले. आज रात्री तर या यात्रोत्सवात गर्दीने उंचाक गाठला दिवसभरात विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी, सिनेकलावंतांनी भराडीचे दर्शन घेतले. जागृकतेचा महिमा सांगणाऱ्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या वार्षिकोत्सवासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने तसेच प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. खासगी वाहनांमधून भाविक रात्रीपासून आंगणेवाडीत दाखल होत होते. देवीच्या दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या पुलांवर भाविकांनी रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. मध्यरात्री सव्वा तीन वाजल्यापासून देवीच्या दर्शनास, ओट्या भरण्यास सुरूवात झाली. वार्षिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती. भाविकांना देवीचे दर्शन चांगल्यारितीने व्हावे यासाठी नऊ रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र रांग होती. त्यामुळे भाविकांना चांगले दर्शन घेता आले. पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

यावर्षी मुखदर्शनाची सुविधाही ग्रामस्थ मंडळाने भाविकांसाठी उपलब्ध करून दिली होती. याचा भाविकांनी लाभ घेतला. सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी झाली होती. देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक खरेदी करून माघारी परतत होते. सकाळच्या सत्रात भाजपचे नेते आशिष शेलार, माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार, विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, संदेश पारकर, रवींद्र फाटक, बबन शिंदे, हरी खोबरेकर, विनोदी कलाकार भूषण कडू यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले तर दुपारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, नीलम राणे, आमदार नीतेश राणे, भाजप नेते अशोक सावंत यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले. मुंबई, ठाणे, वसई महापालिकेतील नगरसेवकांनीही आंगणेवाडीत हजेरी लावत भराडीचे दर्शन घेतले. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही भराडी मातेचे दर्शन घेतले. नवस बोलणे, फेडणे तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुपारनंतर आंगणेवाडीत भाविकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली.

एसटी प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी मालवण, कुडाळ, कणकवली बसस्थानकच्यावतीने दिवसभर बसफेर्‍या सुरू होत्या. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. एसटी बसफेर्‍यांबरोबरच खासगी सहाआसनी, तीन आसनी तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक आंगणेवाडीत दाखल होत होते. वाहनतळाची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वार्षिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईसह अन्य भागातून आज चाकरमानी भराडी मातेच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल होत होते. यासाठी कुडाळ, कणकवली रेल्वेस्थानक याठिकाणी बसफेर्‍यांची सुविधा एसटी प्रशासनाने केली होती. वार्षिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आंगणेवाडीत विविध ठिकाणी हॉटेल्स, मिठाई, गृहोपयोगी साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी हॉटेल्स् तसेच विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. आंगणेवाडीत जिल्हा बँकेच्यावतीने बचतगटांच्या मालांचा स्टॉल उभारण्यात आला होता. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्यावतीने भाविकांना सेवा दिली जात होती.

वार्षिकोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वार्षिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आंगणेवाडीत आरोग्य, अग्निशमन दल, महसूलची पथके कार्यरत ठेवण्यात आली होती.

You cannot copy content of this page