बांदा ता.२४-:* अवकाळी पावसाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून मडुऱ्यात मिरचीच्या रोपांना कुडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक फवारणी करून सुद्धा रोग कमी होत नसून शेतकरी हवालदिल झाला आहे
. त्यात योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही कृषी अधिकारी येत नसल्याचे सांगत मिरची उत्पादकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तसेच जर मिरचीचे नुकसान झाल्यास तीच रोपे तालुका कृषी अधिकाऱ्यांना लागवडीसाठी देणार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. मिरची रोपांचे नुकसान झाल्यास उत्पादनासाठी शेणखत, रासायनिक खते, मजुरी, नांगरणी, औषध फवारणी, पाण्याचा केलेला खर्च मातीत जाणार आहे. गावातील कृषी अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर कोणताही अधिकारी गावात आला नाही. नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी अधिकारी येणार का, असा सवाल पिंट्या परब यांनी केला.
