मालवण ता.२४-: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचे दर्शन घेऊन मुंबईला परतणाऱ्या खाजगी बस आणि मालवणला जाणाऱ्या ज्युपीटर या दुचाकीची आज गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील धोकादायक वळणावर अपघात होऊन या अपघातात युवती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, अपघातानंतर पळून जाणाऱ्या खाजगी बसला स्थानिक ग्रामस्थांनी अडवून जाब विचारल्यानंतर नरमाईची भूमिका घेत बस चालकाने त्या युवतीचा वैद्यकीय खर्च देण्याचे मान्य केल्याने या वादावर पडदा पडला आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रेला मुंबई उपनगरातील एका शिवसेना नगरसेविकेने आपल्या वॉर्ड मधील नागरिकांना यात्रा दर्शन घडविण्यासाठी मुंबईहून आंगणेवाडीला खाजगी बस पाठविली होती.
आज सकाळी या बसमधील लोकांनी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचे दर्शन घेऊन मुंबईला परतत होते त्यावेळी बस आनंदव्हाल येथे आली असता बसच्या मागील बाजुला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवरील मालवणच्या युवतीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.सदर युवतीला तत्काळ उपचाराची गरज असताना तिथेच ठेवून बस मार्गस्थ झाली.आनंदव्हाळ ग्रामस्थांनी बसचा पाठलाग करुन चौके बाजारपेठेत बस अडवली.यावेळी चालकाला या अपघाताबाबत विचारणा केली असता बसमधील मुंबई- दहिसर येथून शिवसेना नगरसेविकेसोबत आलेले प्रवाशी आपली अपघात झाल्याची जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते बसमधील नगसेविका प्रवाशी आणि ग्रामस्थ यांच्यात जवळपास एक तास बाचाबाची चालू होती.
शेवटी संतापलेल्या ग्रामस्थांना पाहून शिवसेना नगरसेविकेने नरमाईची भुमिका घेत गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचाराचा खर्च देण्याचे कबूल केले.यानंतर सुमारे दोन तासांनी मार्गस्थ झाली तर गंभीर दुखापत झालेल्या युवतीला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले..
अन अपघातस्थळी सुदेश आचरेकर धावले युवतीच्या मदतीला..
मालवण येथील माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुदेश आचरेकर हे आपली पत्नी माजी नगरसेविका सौ स्नेहा आचरेकर यांच्या समवेत या मार्गाने प्रवास करत असताना हा अपघात घडला यावेळी श्री आचरेकर दाम्पत्याने गंभीर युवतीच्या मदतीला धावून जात तत्काळ रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालयात अधीक उपचारासाठी हलविले
